राजकीय
नगरपालिकेचा कारभार पारदर्शी व प्रामाणिकपणे चालवणार : नवनिर्वाचित नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे
शिरूर नगरपरिषद नगराध्यक्षपद पदग्रहण समारंभ संपन्न
लोक वार्ता न्युज शिरूर :-
“नगरपालिकेचा कारभार पारदर्शी व प्रामाणिकपणे चालवला जाईल. प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकून घेतला जाईल. नगराध्यक्षपद ही जबाबदारी असून सेवेची संधी असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे सांगितले .
शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी आज विधिवत स्वीकारली.
पदग्रहणापूर्वी त्यांनी माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मिरवणुकीने त्या नगरपरिषद कार्यालयात दाखल झाल्यापदग्रहण सोहळ्यास म्हाडाचे सभापती तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक तसेच माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील, आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषा कटके, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, थेऊर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप,
भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार आदीसह मान्यवर उपस्थित होते. .
यावेळी पुढे बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांनी सांगितले की,शिरूर शहरासाठी शुद्ध पाणीपुरवठा, मजबूत रस्ते, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसारखी महत्वाची कामे प्राधान्याने सर्वांना सोबत घेऊन मार्गी लावली जातील.
पदग्रहणानंतर रसिकलाल धारीवाल सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्षा पाचर्णे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव म्हणाले, “रचनात्मक विकासाच्या माध्यमातून शिरूर शहराचा कायापालट करावा. नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेऊन विकासाचा ठोस ‘रोड मॅप’ तयार करावा.
म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून, भविष्यात शिरूर शहर स्मार्ट सिटी म्हणून उभे राहावे.
या वेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल बोलताना म्हणाले की,
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी मनभेद न ठेवता काम करावे तसेच “नगरपालिकेत काम करत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शिरूरमध्ये राबविण्यात आल्या. विकासकामांसाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी सहकार्य केले,” असल्याचे माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी सांगितले.
विविध संस्था व संघटनांच्या वतीने नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मनीषा कटके, सुभाष पवार, रवींद्र धनक, रविंद्र काळे, दादा पाटील फराटे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण यांनी केले, तर आभार माजी नगरसेवक अभिजित पाचर्णे यांनी मानले.



